विनामास्क फिरणे, रस्त्यावर थुंकणे 12 हजार जणांना महागात
लोणी काळभोर (प्रतिनिधी) –जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी मागील तीन दिवसांच्या काळात ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्या बारा हजारांहून अधिक नागरिकांच्यावर दंडात्मक कारवाई करून, तब्बल तीस लाख पन्नास हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
करोनाचा प्रकोप रोखण्यासाठी मास्कचा वापर हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तीन दिवसांपूर्वी विनामास्क बाहेर पडणारे अथवा पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिसांना दिल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कारवाई सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सध्या कारवाई सुरू आहे.
अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, जिल्ह्यात 31 पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनामास्क फिरणारे व रस्त्यावर थुंकणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. तीन दिवसांच्या काळात बारा हजारांहून अधिक नागरिकांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून 30 लाख 50 हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. करोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करण्याबाबतच्या सूचना प्रशासन वेळोवेळी देत असतानाही, नागरिक सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आल्यानेच, वरील दंडात्मक कारवाई करण्याची वेळ पोलिसांच्यावर आलेली आहे. गणपती विसर्जनानंतर कारवाईला आनखी वेग देण्यात येणार आहे. करोना पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत कारवाई करणे सुरु ठेवणार आहोत.