मुंबई – बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी नवा चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘IB71’ असे आहे. १९७१ साली झालेल्या एका मोठ्या गुप्त मिशनच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या गुप्त मिशनसाठी ३० एजंटने १० दिवसांत विजय मिळवण्याची तयारी केली होती. पाकिस्तान विरोधात देशाला विजय मिळवून देणारी कथा तब्बल ५० वर्षे अनेकांना माहितीही नव्हती. आता हीच कथा अनेक वर्षांनी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या दमदार ट्रेलरच्या सुरवातीला एका विमानाने दिसते ज्याचा IB एजंट विद्युत जामवाल पायलट आहे. मात्र हे विमान क्रॅश होणार असल्याने आत बसलेले सगळे घाबरल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर कोणीतरी त्यांना लँडिंग रद्द करण्याचा सल्ला देत असल्याचे पाहायला मिळते.
या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना १९७१ मध्ये झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. विद्युत जामवाल अभिनयासोबतच या चित्रपटाचा निर्माता देखील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संकल्प रेड्डी यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.