गुन्हा दाखल करायला १६ वर्ष ! कवडीपाट टोलनाक्याबाबत सार्वजनिक जागरूकता

पुणे: ‘वराती मागून घोडे’ या म्हणीचा पायरीचय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामातून आला आहे. १६ वर्षांपूर्वी बांधलेल्या टोल नाक्याची जागा चुकली असल्याची जाणीव आत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला झाली आहे. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट या नाक्याची जागा परस्पर बदलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाची उभारणी करणाऱ्या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बीओटी तत्त्वावर उभारलेल्या चारपदरी रस्त्यावर टोलवसुलीसाठी कवडीपाट येथे टोलनाक्याची उभारणी करण्यात आली होती. पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले असल्याने, राज्य शासनाने कवडीपाट ते कासुर्डी (यवत ता. दौंड) या दरम्यान पंचवीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याची बीओटी तत्वानुसार उभारणी केली होती. हा रस्ता आयर्न टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी कडून उभारण्यात आला होता. त्यानंतर १६ वर्षे या रस्त्यावर कंपनीकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली सुरु होती. मागील सहा महिन्यापूर्वी हि टोल वसुली थांबवण्यात आली आहे.

श्रुती नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ किलोमीटर अंतराच्या महामार्गाची उभारणी, देखरेख व टोलनाक्यांची जागा निश्चित करणे व आयर्न टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मदत करण्यासाठी शासनाने वाडीया टेक्नो इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली होती.

कवडीपाट ते कासुर्डी रस्ता काम सुरु झाल्यापासुन, गेली १६ वर्षे टोलनाक्याची जागा चुकीची असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. मात्र राजकीय दबावामुळे अन्याय केला होता. आवाज उठवल्याबद्दल पोलिसांच्या मार्फत खोटे गुन्हे नोंदवून कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याचाही प्रयत्न कंपनीने केला. मात्र , आता कंपनीवरच गुन्हा दाखल झाल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे. आमच्या जागेत टोल वसुली नाका उभारल्यामुळे मागील सोळा वर्षे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. बांधकाम विभागाने हे नुकसान भरून द्यावे यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे.                                                                   – राहुल कदम,तक्रारदार शेतकरी

त्यानंतर कवडीपाट येथे नियोजित टोलनाक्याची जागा या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वत:च्या अधिकारात परस्पर बदलून ठरलेल्या जागेच्या ५० मिटर पुढे नेली. यामुळे राहुल कदम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले होते. राहुल कदम यांनी माहिती अधिकाराखाली तक्रार केली होती. उत्तरात वाडिया कंपनीने टोल वसुली नाक्याची जागा परस्पर बदलल्याचे निष्पन्न झाल्याने या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या टोलवर सुरु असलेली वसुली थांबल्यानंतर हि बाब लक्षात आल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाची अवस्था ‘वराती मागून घोडे’ अशी झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)