वाघिरे महाविद्यालयाचा उपक्रम
सासवड- अनंत चतुर्दशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर घरगुती व सार्वजनिक गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते. यावेळी गणपती विसर्जनाबरोबरच हार, फुले या स्वरूपाचे निर्माल्यही नदीत सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे वाघिरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सासवड येथील संगमेश्वर मंदिर व सोपानदेव मंदिर येथील नदीपात्रावर निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एकूण 3 टन निर्माल्य गोळा केले आहे.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांना निर्माल्य नदीत न सोडता निर्माल्य कुंडात टाकण्याचे आवाहन केले. तसेच गणपती मूर्तींचे विसर्जन नदीत न करता विसर्जनासाठी सासवड नगरपरिषदेने तयार केलेल्या स्वतंत्र कुंडात करण्याचे आवाहन केले. जमा झालेले 3 टन निर्माल्य वाघिरे महाविद्यालयातर्फे संकलित करण्यात आले. याचे सेंद्रीय खत केले जाणार आहे व त्याचे पुरंदर तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांमध्ये वाटप केले जाणार आहे. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या 52 स्वयंसेवक सहभागी झाले होते. या उपक्रमाचे आयोजन वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर लिपारे, डॉ. संदीप राठोड, प्रा. स्नेहल सोळंकुरे, प्रा. ज्ञानेश्वर जगदाळे, प्रा. सिद्धार्थ घोंगडे यांनी केले होते.