पुणे- निरा-निंबुत येथील ज्युबिलंट लाइफ सायन्सेस या कंपनी विरोधात पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने आतताईपणे निर्णय घेत आंदोलकांच्या विरोधात तडीपारीची नोटीस बजावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे रिपाइंच्या वतीने शनिवारी (दि. 14) बारामती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेल्या महितीनुसार 11 सप्टेंबर रोजी निरा येथील ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आंदोलनापूर्वी जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनास गरजेपेक्षा जास्त पोलीस कुमक आणून आंदोलनकर्ते व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पक्षाचे कार्याध्यक्ष पंकज धिवार यांनी केला आहे.
लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी कंपनीसोबत उभे राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. तसेच ज्युबिलंट लाइफ सायन्सस ही कंपनी निरा परिसरातून औद्योगिक वसाहतीमध्ये स्थलांतरित करावी व तीन महिन्यांपूर्वी कंपनीत झालेल्या दुर्घटनेबद्दल कंपनी प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी धिवार यांनी केली आहे.
बारामती
व पुरंदरच्या तहसीलदारांनी आंदोलनास परवानगी दिलेली असताना जेजुरी पोलिसांनी आंदोलकांवर केलेली तडीपारीची करवाई संशयास्पद असल्याचा आरोप धिवार यांनी केला आहे. तसेच बारामती येथे पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.