मुंबई – मराठी अभिनेता ‘प्रसाद ओक’ सिनेरसिकांसाठी लवकर एक सुंदर विषयावर चित्रपट घेऊन येणार आहे. शिवराज्याभिषेकावर आतापर्यंत अनेक गाणी आली. मात्र, प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ या चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचे गाणे या सर्व गाण्यांमध्ये वेगळे ठरणार आहे. कारण नऊ मराठी कलाकार, सहा लोककला प्रकारांचा या एकाच गाण्यात समावेश आहे. नुकतंच हे भव्यदिव्य असं मराठी लोकगीत (गाणं) लाँच करण्यात आलं. शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची भव्यता दर्शवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, क्षिती जोग, राजश्री ठाकूर, संगीतकार राहुल रानडे या गाण्यात दिसत आहेत. तर ओवी, पोवाडा, कव्वाली, अभंग, धनगर, शेतकरी अशा सहा पारंपरिक लोककलांचा या गाण्यात समावेश आहे. या गाण्याचं लेखन कविभूषण, संदीप खरे यांनी केलं असून, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.
‘कच्चा लिंबू’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर प्रसाद ओकचा ‘हिरकणी’ महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत 24 ऑक्टोबरला संपूर्ण महारष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.