पिंपरी – भोसरी एमआयडीसीतील प्लॉट नंबर 37 येथे महापालिकेच्या वतीने लावलेल्या 292 झाडांची महापालिकेच्या परवानगीनेच कत्तल सुरु झाली आहे. त्यातील केवळ 77 झाडांचे पुनर्रोपन केले जाणार आहे.
एमआयडीसीने भोसरीतील प्लॉट नंबर 37 वृक्षारोपणासाठी महापालिकेकडे हस्तांतरित केला होता. पाच एकरचा हा भूखंड आहे. या जागेवर महापालिकेने 1997 सालापासून वृक्षारोपण सुरु केले. अर्जुन, निलगिरी, बाभुळ, पिंपळ, कडुनिम, पिंपर्णी, आपटा, फुलवंती, बकुळ, पेल्टा अशा 292 झाडांची लागवड केली होती. ही झाडे मोठी झाली आहेत. आता या झाडांची कत्तल सुरु केली आहे.
एमआयडीसीने हा प्लॉट परस्पर विक्री केला आहे. त्यामुळे प्लॉटवरील झाडे तोडण्याची परवानगी संबंधित जागा मालकाने महापालिकेकडे मागितली होती. त्यानुसार नियमाने झाडे तोडण्यास परवनागी दिल्याचा दावा पालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. मात्र, झाडे तोडायचीच होती तर लावली कशासाठी असा सवाल वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
तसेच झाडे तोडण्यासाठी परवानगी देताना नियमांचे कोणतेही पालन केले नाही. झाडांवर नोटिसा लावल्या नाहीत. वृत्तपत्रात नोटीस दिली नाही. महापालिका संकेतस्थळावर देखील माहिती दिली नाही. हरकती मागविल्या नाहीत, असा आरोपही होत आहे. 8 फेब्रुवारीला महापालिकेने 292 झाडे तोडायला परवानगी दिली. त्यातील केवळ 77 झाडांचे पुनर्रोपन केले जाणार आहे. प्लॉटच्या बाजुने पुनर्रोपन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात किती झाडांचे पुनर्रोपन होईल असा प्रश्न उपस्थित केला आहे.
वृक्षतोड करण्याची परवानगी नियमानुसारच देण्यात आली आहे. झाडांना नोटीस लावण्या ऐवजी प्लॉटच्या प्रवेशद्वारावर नोटीस लावली होती. तर, वृत्तपत्रात अधिकृत जाहिरात दिली आहे. याबाबत येत्या 15 ला आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येणार आहे
– प्रकाश गायकवाड, वृक्ष अधीक्षक उद्यान विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका