पुणे : खडकवासला लोकसभा मतदारसंघातील धायरीसह तब्बल 29 ग्रामपंचायतींनी व 4 प्रभागातील नागरिकांनी दि.9 जून रोजी एकाच दिवशी विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर करण्याचे ठरवले आहे. यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुढाकार घेतला आहे.
समाजात आजही विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते आहे. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जाते. महाराष्ट्र शासन आणि राज्य महिला आयोगाने या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात देखील याला चांगला प्रतिसाद मिळत असून खडकवासला लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ असेल जो 100 टक्के विधवा प्रथा बंदी करणारा ठरेल.