पुणे : “इट राइट चॅलेंज’ स्पर्धेमध्ये पुणे विभागाची अभिमानास्पद कामगिरी केली असून, देशपातळीवरील पुरस्कार मिळवला आहे. भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणातर्फे “इट राइट ‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या अंमलबजावणीचे कामासह ग्राहक जागृती, अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण, इट राइट कॅम्पस, धार्मिक स्थळांमधील प्रसादाची स्वच्छता आणि सुरक्षा, पदपथावर विक्री होणाऱ्या अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत हमी आदी निकषांवर देशभरातून 75 उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याची निवड करण्यात आली. त्यामध्ये संपूर्ण देशात पुण्याचा क्रमांक 10 वा तर, सोलापूरचा क्रमांक 21 वा आला आहे. 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित समारंभात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा सत्कार करण्यात आला.
दैनंदिन अंमलबजावणीसह जे. एम. कॉर्नर या ठिकाणाला क्लिन स्ट्रीट फूड हबचा दर्जा मिळाला आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर मंदीर, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदीर येथील अन्नछत्राला स्वच्छ प्रसाद निर्मिती आणि वाटपासाठी “भोग प्रमाणपत्र’ मिळाले आहे. यामध्ये “एफडीए’चे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संजय नारागुडे, अर्जुन भुजबळ, बाळू ठाकूर, साहेबराव देसाई, श्रीकांत करकाळे आणि सर्व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कामकाज केले.
116 हॉटेल्सना हायजिन रेटिंगचा दर्जा पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, यशदा, येरवडा कारागृह, सिरम इन्स्टिट्यूट येथील कॅन्टीनला “इट राइट कॅम्पस’चा दर्जा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील आकुर्डी, कॅंप, बारामती, देहू 1-2, चाकण, चिंचवड आणि लोणावळा येथील फळे आणि भाजीपाला मार्केटसाठी “क्लिन अँड फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल मार्केट’चा दर्जा मिळाला आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील 116 हॉटेल्सना हायजिन रेटिंगचा दर्जा मिळाला आहे.