सुनील राऊत
पुणे : पुणे महापालिका अग्निशमन दलात स्थापनेपासून एकही महिला कर्मचारी नियुक्त केली गेली नसल्याचा प्रकार “प्रभात’ने “येथे महिलांचे अस्तित्त्व “उणे’ या वृत्ताद्वारे समोर आणला होता. त्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून, याबाबत खुलासा करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. याशिवाय महिला आयोगाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना याबाबत सूचना देणार आहोत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. महापालिकेत लवकरच अग्निशमन दलाची सुमारे 150 पदे भरली जाणार असून, यात महिलांना संधी दिली जाणार आहे. या विभागासाठी जवळपास 910 पदे मंजूर असून त्यातील 500 हून अधिक पदे रिक्त आहेत. तर महापालिकेनेही या विभागाची सेवा नियामवली मंजूर नसल्याचे कारण देत प्रत्येक वेळी केवळ पुरूष उमेदवारांनाच संधी दिलेली आहे.
असे आहे आयोगाचे पत्र
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांनी “प्रभात’च्या वृत्ताची दखल घेत महापालिकेस पत्र पाठविले आहे. त्यानुसार, “अग्निशमन दलाच्या स्थापनेपासून आजपर्यंत किती महिला अधिकारी, कर्मचारी कार्यरत होत्या अथवा आहेत? या विभागात महिलांसाठी आरक्षणाची तरतूद आहे का? एकूण किती पदे या विभागात रिक्त आहेत? याचा सद्यस्थितीदर्शक अहवाल आयोगास पाठवावा,’ अशा सूचना महापालिका प्रशासनास करण्यात आल्या आहेत.
राज्यात फक्त मुंबई आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतच महिलांना अग्निशमन सेवेची संधी देण्यात आली आहे. मात्र, पुण्याप्रमाणेच आता इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशमन विभागात महिलांना संधी मिळावी, यासाठी शासन निर्णय घेतला जाणार आहे. सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असून या क्षेत्रातही त्यांना समान संधी मिळावी यासाठी आयोगाकडून सर्वोत्परी याचा पाठपुरावा केला जाणार आहे.
– रुपाली चाकणकर (अध्यक्ष, राज्य महिला आयोग)