पुणे – सर्वाधिक 58 इच्छुक उमेदवार असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात भाजपचे सुनील कांबळे व कॉंग्रेसचे रमेश बागवे या दोन प्रमुख उमेदवारांसह इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
तर, दुसरीकडे भाजप उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केलेले माजी नगरसेवक डॉ. भरत वैरागे आणि शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांनी अर्ज मागे घेतल्याने येथे भाजपला बंडखोरी मोडित काढण्यात यश आले आहे. तर, कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार सदानंद शेट्टी यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. या दोन्ही प्रमुख उमेदवारांसह या मतदारसंघात आता आम आदमी पक्षाकडून खेमचंद सोनवणे, एमआयएमकडून हीना मोमीन, मनसेकडून मनीषा सरोदे, वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे आणि बहुजन मुक्ती पार्टीचे किशोर तुपारे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
त्यामुळे कॉस्मोपॉलिटीअन मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक बहुरंगी होणार आहे.
शहरातील आठही मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज दाखल आणि उमेदवार संख्या या मतदारसंघात आहे. येथे एकूण 85 अर्ज दाखल झाले होते, यापैकी 58 उमेदवारांचे अर्ज वैध तर 27 जणांचे अर्ज अवैध ठरले होते.
दरम्यान, उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर त्यांना लगेचच चिन्ह वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी निता शिंदे यांनी दिली.