अमोल चव्हाण
ढेबेवाडी – पाटण तालुक्याच्या राजकारणात नेहमीच पक्षीय राजकारणापेक्षा गटाच्याच राजकारणाला लोकांनी प्राधान्य दिले असले तरी दोन गटात विभागलेल्या राजकारणाला कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून हिंदूराव पाटील यांनी तिसरी ताकद उभी करुन तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी दिल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात कॉंग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
विधानसभेच्या निवडणूकीत हिंदूराव पाटील यांची ताकद महत्वाची असून त्यांच्याच ताकदीच्या जोरावर आघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील विभाग म्हणून ढेबेवाडी विभागाकडे पाहिले जाते. त्यामुळे पाटण तालुक्याच्या राजकारणाची सूत्रे याच विभागातून फिरली जातात. त्यामुळे देसाई-पाटणकर गटाचे लक्ष या विभागावर असते.
देसाई-पाटणकर गटात जरी निवडणूका होत असल्या तरी कॉंग्रेस पक्षाने 20 वर्षाच्या काळात तालुक्यात प्रत्येक विभागात संघटना वाढवून आपली क्षमता सिध्द केली आहे. देसाई-पाटणकर गटाच्या राजकारणात पाटणचा आमदार कोण? हे हिंदूराव पाटीलच ठरवणार असल्याची चर्चा सुरु आहे.
पाटण तालुक्यात कधीच पक्षीय राजकारणाला थारा मिळाला नाही. अनेक वर्षे पाटणकर गट आणि देसाई गट असाच संघर्ष झाला. मात्र गेली 25 वर्षाच्या राजकीय कालावधीत या राजकारणाला फाटा देत कॉंग्रेसचे हिंदूराव पाटील यांनी तिसरा गट तयार करुन तालुक्यात वेगळे अस्तिव निर्माण केले.तालुक्यात कॉंग्रेसच्या विचारांचे 20 हजार मतदान आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून कितीही कांगावा केला. तरी हिंदूराव पाटील जिकडे तो आमदार असे चित्र आहे.