मेडन, (इंडोनेशिया) – इंडोनेशियाच्या किनाऱ्याजवळ एक प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान दोघांचा मृत्यू झाला आणि 26 जण बेपत्ता झाले आहेत. या लाकडी प्रवासी बोटीमधून 89 शरणार्थ्यांना नेले जात होते. ही बोट शेजारच्या मलेशियाला जात होती. ही बोट नेहमीच्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने जात होती. सोसाट्याचा वारा आमि लाटांमुळे बोट बुडाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बोटीतील एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. तर 61 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 26 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी मदतीच्या बोटी रवाना करण्यात आल्या आहेत, असे मदत आणि बचाव पथकाच्या प्रमुखांनी सांगितले. बुडालेली बोट देखील किनाऱ्यावर आणण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे शरणार्थी संपूर्ण इंडोनेशियातून एकत्र आले होते. रोजगाराच्या शोधासाठी ते मलेशियाला जात होते. मात्र त्यांच्याकडे देशांतरासाठीची कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे आणि उंच उसळत असलेल्या लाटांमुले बोट बुडाल्याचेही त्यांनी सांगितले.