सातारा – जावळी तालुक्यात 27 गावांसह मेढा नगरपंचायत क्षेत्राचा समावेश कन्टेनमेंट झोनमध्ये करण्यात आला होता. या क्षेत्रात गुन्हेगारी प्रक्रिया संहिता कलम 144 अन्वये मनाई आदेश 26 एप्रिल रोजी जारी केले होते. आता या मनाई आदेशातील तरतुदी फक्त म्हाते मुरा व म्हाते खुर्द या गावांसाठीच लागू राहणार असून इतर गावे कन्टेनमेंट झोनमधून मुक्त करण्यात आल्याची माहिती सातारचे उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी बुधवारी दिली.
करोनाचा संसर्ग वाढत असल्याने यापूर्वी जावळी तालुक्यातील धनकवडी, निझरे, करंदी तर्फ मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कुसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी तर्फ मेढा, जवळवाडी, म्हाते खुर्द, म्हाते बुद्रुक, वागदरे, गोंदे माळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर तर्फ मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी तर्फ मेढा, सावली ही गावे व मेढा नगरपंचायत यांचा समावेश कन्टेनमेंट झोनमध्ये करून मनाई आदेश लागू करण्यात आले होते. निझरे गावात चार व म्हाते मुरा गावात दोन करोनाबाधित रुग्ण आढळले होते.
निझरे, म्हाते मुरा या गावांसह तीन किमी परिसरात कन्टेनमेंट झोन लागू करण्यात आला होता. जावळी तालुक्यातील या सर्व बाधित व्यक्तींचे 14 व्या आणि 15 व्या दिवसानंतरचे टेस्ट रिपोर्टस् निगेटिव्ह आल्याने निझरे गावाचा कन्टेनमेंट झोन रद्द करण्यात आला आहे; परंतु म्हाते मुरा व म्हाते खुर्द येथील कन्टेनमेंट झोन सुरू करुन 14 दिवसांचा कालावधी झाला आहे. तो अजून काही दिवस सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाच्या कन्टेनमेंट झोनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निझरे गाव केंद्रस्थानी धरून तीन किमी परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्याचा या आधीचा आदेश रद्द करण्यात आला आहे.
उद्या, दि. 7 पासून पुढील आदेशापर्यंत जावळी तालुक्यातील 27 गावे व मेढा नगरपंचायत वगळून म्हाते मुरा व म्हाते खुर्द या दोनच गावांसाठी गुन्हेगारी प्रक्रिया संहिता कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. इतर गावांना हे आदेश लागू राहणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 5 रोजी दिलेल्या आदेशातील मार्गदर्शक सूचना व अटी यापुढेही लागू राहतील, असे प्रांताधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.