हिरे व्यवसायातील 25 टक्के कामगार पुन्हा गावाकडे; अहमदाबाद व सुरतमधील करोनाच्या भीषण परिस्थितीचा परिणाम

कोलकता – पश्चिम बंगाल व अन्य राज्यांमधून रोजगाराच्या शोधात सुरतमध्ये आलेले आणि हिरे व्यवसायात काम करणाऱ्या 25 टक्के कामगारांनी सुरतमधून काढता पाय घेतला आहे. गुजरातमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

गेल्या आठवड्यापासून अहमदाबाद आणि सुरत ही दोन मोठी शहरे करोनाचा हॉटस्पॉट बनली आहेत. अत्यवस्थ करोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकांच्या रांगा लागल्याचे अस्वस्थ करणारे चित्र दिसत आहे. गुजरातमधील करोनाच्या भीषण परिस्थितीबद्दल तेथील उच्च न्यायालयाने दोन वेळा राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. या सगळ्या गोष्टींचा स्वाभाविक परिणाम जनमानसावर आणि स्थलांतरित कामगारांवर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसत आहे.

हिऱ्यांचा व्यापार, कटींग आणि पॉलिशिंग या कामात सुमारे दहा लाख कामगार काम करतात. त्यातील सुमारे चार लाख कामगार हे पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून आलेले आहेत. सुरतमधील आता या कामगारांची टंचाई भासू लागली आहे. सुरतमध्ये रोज करोनाबाधितांची तसेच करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या भीतीने कामगारांनी परतीचा रस्ता धरला आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने अचानकपणे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्थलांतरीत कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना अतिशय हाल सोसावे लागले. हातात पैसा नाही, काम नाही अशा स्थितीत त्यांना अडकून पडावे लागले किंवा परत गावाकडे जाण्यासाठी मरणप्राय पायपीट करावी लागली. हा अनुभव लक्षात घेऊन कामगारांनी पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या भीतीने आधीच गाव गाठणे पसंत केले आहे, असे गुजरातमधील डायमंड वर्कर्स युनियनचे अध्यक्ष भावेश टांक यांनी सांगितले.

गेल्या वर्षी जगभरात करोनाचा मोठा संसर्ग झाल्याने त्याचा फटका जेम्स अँड डायमंड क्षेत्राला बसला. 2020-21 या आर्थिक वर्षात हिरे आणि दागिने निर्यातीत 28.46 टक्क्यांची घट झाली. त्या आधीच्या वर्षात निर्यात 35.3 अब्ज डॉलर एवढी होती ती 2020-21 मध्ये 25.3 अब्ज डॉलरपर्यंत घसरली. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) ही आकडेवारी जाहीर केली आहे.

बरोबर असलेली पत्नी, मुले यांना गावाकडे सोडण्यासाठी प्रामुख्याने कामगार परत जात आहेत. सुमारे 20 ते 25 टक्के कामगार परत गेले आहेत. हे तात्पुरते स्थलांतर असून पंधरा-वीस दिवसांनी हे कामगार परत येतील असा विश्वास जीजेईपीसीचे विभागीय अध्यक्ष दिनेश नवादिया यांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.