नांदेड – देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना पिकअप टेम्पोचा अपघात झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट हिमायतनगर -नांदेड राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले आहेत. सर्वजण नांदेड जिल्ह्यातील असून आडेली देवीचा नवस फेडण्यासाठी जात होते. यावेळी अचानक टेम्पो पलटी होऊन अपघात घडला.
हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील नागरिक तेलंगणा राज्यातील आडेली देवीचा नवस फेडण्यासाठी जात होते. दरम्यान अचानक किनवट तालुक्यातील शिवनीपासून थोडे अंतर पुढे जाताच रस्त्याचा अंदाज न आल्याने पिकअप टेम्पो पलटी झाला. यात एकाच कुटुंबातील 12 जण व इतर गावातील नागरिक असे एकूण 25 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातात 13 जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारसाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. तर इतर किरकोळ जखमींवर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.