313 एटीएममध्ये 25 कोटींचा भरणा – डॉ. दीपक म्हैसेकर

“यूआयडी’च्या माध्यमातून पैसे देण्याच्या सूचना

पुणे -पुरामुळे बाधित क्षेत्रातील 469 एटीएमपैकी बंद एटीएम यंत्रे दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या 313 एटीएम मशीन सुरळीत करण्यात यश आले असून त्यांच्यामध्ये 25 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील पूरस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.

यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, एसबीआय व ट्रेझरी बॅंकांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना तातडीने रक्‍कम उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कोणत्याही मृत जनावरांचे स्वतंत्र शवविच्छेदन न करता संबंधित बाधीतांना विमा रक्‍कम मंजूर करण्याच्या सूचना वीमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सक्‍ती करण्यात येणार नाही.

ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांसह पुलांची कामे करून त्यांच्याशी संपर्क पूर्ववत प्रस्थापित करण्याचे काम सुरू आहे. तसेच जादादराने जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अलमट्टीतून 5 लाख 70 हजार क्‍युसेक विसर्ग

अलमट्टी धरणातून 5 लाख 70 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे, मात्र धरणात 6 लाख 11 हजार क्‍युसेक एवढी पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पूर पातळी कमी होण्यास वेळ लागत आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या नद्या अजूनही धोका पातळीच्यावर सरासरी 5 फूट वाहत आहेत. विभागातील 147 रस्ते बंद असून 66 पूल पाण्याखाली आहेत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here