वडूज -डंपर चालकाला मारहाण करून त्याच्याकडून खंडणी उकळून त्याच्या खिशातील पैसे चोरून नेल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या अतुल पवारसह त्याच्या टोळीवर 21 लाखांच्या खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. अतुल पवार व अजून एक जण काहीतरी बोलत बसले होते. तर बाकीचे संशयित त्यांनी आणलेल्या पिकअप गाडीतील काही भेसळीच्या वस्तू त्याठिकाणी टाकून त्याचे चित्रिकरण करत होते.
तक्रारदारांनी याबाबत संशयितांना विचारणा केली असता, आम्ही अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, आयकर विभाग पुणे येथील अधिकारी असून अतुल पवार याने केलेल्या तक्रारीनुसार आम्ही माहिती घेण्यासाठी आल्याचे सांगितले. तसेच आता केलेले व्हिडिओ शुटींग आम्ही मीडियाला दाखवून तुझी बदनामी तर करूच पण कारवाईसुध्दा करू, असा दम दिला. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने मला विनाकारण का त्रास देत आहे, माझी बदनामी करून तुला काय मिळणार अशी विनवणी अतुल पवार याला केली.
दरम्यान, इतर दोन संशयितांनी तक्रारदाराला पाठीमागून घट्ट पकडून एकाने तक्रारदाराच्या कानशीलात लगावून मुद्द्याचे बोल असे सुनावले. त्यानंतर अतुल पवार, चंदा मोहिते व रणपिसे यांनी तक्रारदाराला एक कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, इतके पैसे माझ्याकडे नाहीत असे तक्रारदाराने सांगितल्यानंतर तिघांनी जरा लांब जाऊन आपआपसात चर्चा केली. काही वेळाने ते तक्रारदाराकडे आले.
तुझ्याकडे किती पैसे आहेत अशी विचारणा केली असता तक्रारदाराने अकरा लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यावर संशयितांनी अकरा लाख रुपये रोख व तक्रारदार यांच्या स्टेट बॅंक वडूज शाखेचा एक धनादेश जबरदस्तीने तक्रारदाराची सही घेऊन नेला. तसेच याबाबत कोणाला काही बोलला तर आम्ही हे शुटींग व्हायरल करून बदनामी करू, असा दम दिला.
त्यानंतर अतुल पवार 2017 व 2018 या दोन्ही वर्षी तक्रारदाराकडून व्हिडीओ शूटिंग व्हायरल न करण्याची भीती दाखवून प्रतिवर्षी पाच लाख रुपये याप्रमाणे खंडणी घेऊन जात होता. यावर्षी मे महिन्यात अतुल पवारने तक्रारदाराला पैशाची मागणी करण्यास सुरूवात केली. मात्र, करोनामुळे धंदा कमी असल्याने यंदा पैसे देणे शक्य होणार नसल्याचे सांगताच अतुल पवारने “तू कसा धंदा करतोस तेच बघतो,’ अशी धमकी दिली. त्यानंतर पवार काम करत असलेल्या एका यू ट्यूब चॅनेलवर तक्रारदाराशी संबंधित बातमी प्रकाशित करून ती सर्वत्र व्हायरल केल्यानंतर पुन्हा तक्रारदार व पवार यांच्यात वडूज येथे भेट झाल्यावर पैसे दिले नाहीत तर धंदा करणे अवघड होईल अशी धमकी पवार याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करत आहेत.
खोलात जाऊन तपासाची गरज
अतुल पवार व त्याच्या एका टोळीने डंपर मालकाला खंडणी मागून लुटल्याचे प्रकरण ताजे आहे. तोपर्यंत आता नव्या टोळीसोबतचे त्याचे हे नवे प्रकरण बाहेर आल्याने याने अजून किती लोकांना किती टोळ्या करून गंडा घातला आहे का, याचा तपास कसून केल्यास यांचे कारनामे समोर येण्यास मदत होईल. तसेच खासगी सावकारीच्या अनुषंगानेही खोलात जाऊन तपास करण्याची गरज आहे.