नवी दिल्ली – हरियाणातील चरखी- दादरी येथे राहणाऱ्या एका मजुराच्या बॅंक खात्यात अचानक 200 कोटी रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे हा मजुर आणि त्याचे कुटुंब आनंदी होण्याऐवजी दहशतीच्या छायेत वावरत आहेत. संबंधित व्यक्ती आपल्या खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे पाहून खरेतर हबकला आहे. हे पैसे आले कुठुन याचाच विचार तो आणि त्याचे कुटुंबिय करत आहेत. त्याने त्या पैशांना अद्याप हात लावलेला नाही. मात्र या प्रकरणाचे करायचे काय याच विवंचेनत तो आहे.
दरम्यान, झाल्या प्रकाराची माहिती मिळाल्यावर पोलीस त्याच्या घरी दाखल झाल्याने त्याच्याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. वारंवार विचारणा करूनही हे पैसे कुठुन आले ते आपल्याला माहिती नसल्याचे तो सांगतो आहे आणि या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंबच भांबावले आहे.
हरियाणातील बरेला या गावातील हा प्रकार आहे. संबंधित मुजराचे नाव विक्रम असे आहे. सामान्यत: कोणाला अचानक असे घबाड हाती लागले की तो आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर असतो. जुन्या कथा- कादंबऱ्यांमध्येही किंवा पौराणिक कथांमध्ये इश्वराच्या कृपेमुळे कोणाला सोन्याचा हंडा सापडणे, किंवा मोठा खजिना सापडणे अशा गोष्टी वाचल्या- ऐकल्या असतात.
मात्र प्रत्यक्षात बॅंक खात्यात चक्क 200 कोटी रूपये जमा झाले तर या विचारानेच हबकायला होते. विक्रमच्या बाबतीत तसा चमत्कार घडला आहे. पण त्याचा त्याला आनंद होण्याऐवजी त्याच्या डोक्याचा तापच त्यामुळे वाढला असून आपल्याला संरक्षण मिळावे म्हणून त्याने पोलिसांनाच साकडे घातले आहे. आम्ही पोलिसांकडे मदतीसाठी गेलो, मात्र आता तेच आम्हाला धमकी देत आहेत. आमचा यात काय दोष असा सवाल विक्रमचे कुटुंबीय विचारत आहेत.
दोन दिवसांपूर्वी पोलीस त्यांच्या घरी आले होते. येस बॅंकेच्या खात्यात 200 कोटी रूपये आले कुठुन अशी विचारणा करत त्यांनी चौकशी सुरू केली. दरम्यान, बॅंकेने संबंधित खाते गोठवले आहे आणि पोलिसांची टीम लवकरच चौकशीसाठी बॅंकेत जाणार असली तरी पोलिसांच्या प्रश्नांच्या भडिमाराचा सामना त्या मजुराच्या कुटुंबाला करावा लागतो आहे.
उपलब्ध माहितीनुसार विक्रम दोन महिन्यांपूर्वी नौकरीसाठी पटौदी येथे गेला होता. तेथे त्याला एक्स्प्रेस-20 नामक कंपनीत काम मिळाले होते. त्याचे बॅंक खाते तेथेच सुरू करण्यात आले. काही दिवसांनी कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. तुझे खाते बंद केले असल्याचे कंपनीकडून त्याला सांगण्यात आले. आता त्याच कंपनीने अफरातफर करण्यासाठी विक्रमचे खाते सुरू केले असावे अशी शंका व्यक्त केली जात असून त्या अनुशंगाने तपास सुरू करण्यात आला आहे.