मुंबई – मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही उंचावरील दहीहंडी फोडताना गोविंदा जखमी होण्याचा सिलसिला सुरूच असल्याचे बघायला मिळाले. मुंबईत 35 तर, ठाण्यात 13 गोविंदा जखमी झाले आहेत. यात एका महिला गोविंदाचाही समावेश आहे.
मुंबईत दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होते. दहीहंडी उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने गोविंदा रस्त्यावर उतरतात. मात्र दहीहंडी उत्सव साजरा करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास व काही प्रमाणात चुका झाल्यास गोविंदा उंच थरावरून खाली कोसळतात.
यंदाही मुंबईत दुपारी 3 वाजेपर्यंत जखमी गोविंदाची संख्या 35 वर गेली आहे. या गोविंदांमध्ये सर्वाधिक 28 जखमी गोविंदा हे शहर विभागातील आहेत. तर, पश्चिम उपनगरातील जखमी गोविंदांची संख्या 4 आहे. तसेच, पूर्व उपनगरातील जखमी गोविंदांची संख्या 3 आहे. त्याचप्रमाणे या 35 जखमी गोविंदांपैकी सर्वाधिक जखमी गोविंदा केईएम आणि सायन रूग्णालय दाखल आहेत.
यातील नऊ जखमी गोविंदांना उपचार केल्यानंतर घरी पाठविले आहे. तर अद्यापही 26 जखमी गोविंदांवर ओपीडी स्तरावर उपचार सुरू आहेत. ठाणे शहरातही संध्याकाळी सहापर्यंत 13 गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये 9 गोंविदांना कळवा रुग्णालयात तर, 4 गोविंदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहेत. यामध्ये एका महिला गोंविदाचा समावेश असून मणक्याला दुखापत झाल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविले आहे.