सातारा – शहरातील देवी चौकातील दोन दुकानदारांवर सोमवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येकी पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. या दोन्ही दुकानांमधून बंदी असलेल्या सात किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या पथकाने जप्त केल्या.
राज्य शासनाने सिंगल यूज (एकल वापर) प्लॅस्टिक वस्तूंच्या विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरी देखील शहरातील काही दुकानदारांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जातो.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करूनही काही दुकानदार निर्धास्तपणे प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांना देऊ करतात. गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाच्या पथकाने मोती चौकातील 40 दुकानांची अचानक पाहणी केली होती. यावेळी तीन दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला होता.
सोमवारी दुपारी या पथकाने देवी चौकाकडे आपला मोर्चा वळवला. पथकाने या परिसरातील एकूण 25 दुकानांची तपासणी केली. यावेळी दोन दुकानांमध्ये सात किलो प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आढळला. पथकाने प्लास्टिक साठा जप्त केला असून संबंधित दुकानदारांकडून प्रत्येकी पाच असा एकूण दहा हजारांचा दंडही वसूल केला. या कारवाईत आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, आरोग्य निरीक्षक प्रशांत गंजीवाले, संदीप पाटसुते, कपिल मट्टू, तुकाराम खंडझोडे व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.