नेवासा नेवासा नगरपंचायतीचे सात माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याची जोरदार चर्चा गेल्या दोन दिवसांपासून शहरासह तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. तालुक्यात या चर्चेला उधाण आले असून याबाबत अधिकृत कोणीची बोलण्यास तयार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पहिल्या बैठकीत पाच त्यानंतर दोन नगरसेवकांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याची चर्चा जोरदारपणे रंगली. आणखी तीन नगरसेवकही शिंदे गटात सामील होवून दहा नगरसेवक शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेचा या नगरसेवकांकडून खंड करण्यात आलेले नाही.
मात्र जे नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहेत ‘त्या’ नगरसेवकांनी आपल्या नेत्यांच्या बैठकीलाही हजेरी लावलेली असल्यामुळे नेमके सात नगरसेवक फुटले की, नाही? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. याबाबत वस्तुस्थिती नेमकी काय ? हा संशोधनाचा वेगळा विषय असला तरी नगरसेवक फुटीच्या चर्चेने शहरात चांगलाच जोर धरला आहे. नेवासा शहरासह तालुक्याच्या राजकारणावर एकहाती पकड आणि हुकूमत असलेल्या नेत्यांच्या विरोधात नगरसेवक जावून फुटूच शकत नाही? अशी दुसऱ्या बाजूचीही चर्चाही नेवासकरांतून चर्चेली जात आहे, मात्र सात नगरसेवक शिंदे गटात सामील होण्यासाठी झालेल्या बैठकांनाही हजरी लावली. व पुन्हा आपल्या नेत्यांनी घेतलेल्या बैठकीलाही माजी नगरसेवक उपस्थित होते.
याबाबत नगरसेवकांनी मौन बाळगले आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी थांबा आणि पहा हा कानमंत्र देत श्रद्धा और सबुरीचे धोरण अवलंबविल्यामुळे नगरसेवकांच्या फुटीच्या चर्चेत नेवासकरांची बिनपैशात चांगलीच करमणूक होतांना दिसत आहे.
श्रीगोंद्यात झाली बैठक
नेवाशातील सहा माजी नगरसेवक मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या एकाप्रमुख नेत्याला श्रीगोंद्यात भेटून पुढच्या राजकीय वाटचालीसाठी ठाण्यात चर्चा होणार असल्याची माहीती एका माजी नगरसेवकाने यावेळी बोलतांना दिली.