पुणे- मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाचे बनावट मतदान ओळखपत्र, बनावट गहाण खत तयार करून 2 कोटी 26 लाख 26 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणात सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी एकाला 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
नामदेव सोपान कड (वय 60, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. अभिजित जयस्वाल यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. ते ज्येष्ठ नागरिक आहेत. मुख्य आरोपी नाहीत. त्याचा कर्ज व्यवहाराशी काहीही संबंध नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर मुख्य आरोपीला जामीन मिळाला आहे.
पोलिसांनी यापूर्वीच दोन कार आणि दोन ट्रक जप्त केल्या आहेत. अचल संपत्ती बॅंकेकडे मॉरगेज आहे. बॅंक आणि कर्जदारांमध्ये दिवाणी वाद सुरू आहे. ते न्यायालयाने दिलेल्या अटी, शर्तीचे पालन करण्यास तयार आहेत. त्यामुळे जामीन देण्याची मागणी ऍड. अभिजित जयस्वाल यांनी केली.
या प्रकरणात मनोज नामदेव कड आणि बालाजी किसन शिवरकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांना जामीन मंजुर आहे. आणखी एक जणावर गुन्हा दाखल आहे. सोपान बाबुराव कड ही व्यक्ती मयत झाली. त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला उभे करून, बनावट कागदपत्रांद्वारे मार्केट यार्डातील सोलापूर जनता सहकारी बॅंकेतून हे कर्ज काढण्यात आले होते. 19 मार्च 2016 ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात बनावट व्यक्ती म्हणून उभारल्याचा कड याच्यावर आरोप आहे.