आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे विशेष प्रयत्न
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची माहिती
कराड – मलकापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम 60 टक्के पूर्ण झालेले आहे. या इमारतीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तथापि इमारतीसाठी निधीची आवश्यकता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इमारतीचे बांधकामासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने 1 कोटी रुपयांचा पहिला हप्त्याच्या निधी नगरविकास विभागाने मंजूर करुन नगरपरिषदेकडे वर्ग केला आहे.
मलकापूर नगरपरिषदेचे सध्या प्रशासकीय कामकाज यशवंत हौसिंग सोसायटी येथील मुख्य कार्यालय, लक्ष्मीनगर येथील बहुउद्देशीय इमारत व आगाशिवनगर पाणीपुरवठा येथील कार्यालयातून केली जात आहे. याचा विचार करता एका ठिकाणाहून नागरिकांना प्रशासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्या. याकरिता इमारत बांधकाम हाती घेतले आहे. सदर इमारत बांधकामापैकी तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्याचे स्लॅपपर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. सदरचे काम मार्च 2020 अखेर पूर्ण होण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशिल आहे.
नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम अंतिम टप्यात असून या कामादरम्यान शहरातील अनेक रस्ते, सांडपाणी प्रक्रिया पाईप लाईन टाकण्यासाठी उपयोगात आणल्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी नादुरुस्त झाल्याने सदरचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. यासाठी निधीची आवश्यकता असल्याने नगरपरिषदेने मुख्यमंत्री यांचेकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार नगरपरिषदेस 1 कोटी 35 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे.
यामुळे नगरपरिषद हद्दीतील रस्ते नागरिकांच्या वाहतुकीसाठी सुरळीत करणे सोईचे होणार आहे. नगरपरिषदेने यापुर्वी बहुतांश रस्ते आर. सी. सी. करण व डांबरीकरण केलेले आहे. जे रस्ते अपूर्ण आहेत व ज्या रस्त्यांची कामे करणे आवश्यक आहे, असे रस्ते प्राधान्य क्रमाने घेण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. सदर निधी मंजूर करण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार, आ. सतेज उर्फ बंटी पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील तसेच नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, वरिष्ठ लिपीक ज्ञानदेव साळुंखे यांनी सहकार्य केले.