दावडी, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील कनेसर गावात पावसाळ्यापूर्वी सर्व डागडुजी केली जाईल. तसेच गावातील मूलभूत सुविधांच्या कामातील त्रुटींबाबत वरिष्ठांकडे अहवाल दिला जाईल आणि त्याची पूर्तता त्वरीत केली जाईल, असे आश्वासन एमआयडीसी व खेड सिटीच्या ग्रामस्थांना देण्यात आले.
कनेरसर येथील सरपंच सुनीता केदारी व ग्रामस्थांनी एमआयडीसी कार्यालय पुणे येथे आंदोलन केल्यामुळे उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांच्या लेखी आश्वासनानुसार एमआयडीसी व खेड सिटीचे अधिकारी यांनी कनेरसर येथील आर.आर.कॉलनी येथे मंगळवारी (दि. 5) संयुक्त पाहणी करून ग्रामस्थांच्या बैठकीत वरील आश्वासन दिले.
सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी गावाला सार्वजनिक उपक्रमासाठी जागा शिल्लक नसल्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार सर्वेक्षण झाले आहे. याबाबत तसेच ठाकर समाजाच्या जागेप्रश्नी मुंबई येथे एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना भेटणार आहे. एमआयडीसी व खेड सिटीने आर.आर.कॉलनीतील प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी केली.
एमआयडीसीचे उपअभियंता शाम लोणारकर यांनी येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व डागडुजी केली, जाईल अशी हमी दिली. सरपंच सुनीता केदारी, सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब खरपुडे यांनी स्वागत केले. यावेळी खेड तालुका भाजपचे उपाध्यक्ष दिलीपराव माशेरे, सामाजिक कार्यकर्ते अमित खरपुडे, खेड सिटीच्या प्लॅनिंग हेड प्रणाली कोचे, समरसिहं ढेकले, संभाजी पावडे, एमआयडीसीच्या सर्व्हेअर अर्चना बग, अक्षय गवारे, दत्तात्रय केदारी आदी उपस्थित होते.
स्लॅबगळती, रस्ते, पाणी, खेळाचे मैदान, स्मशानभुमी व इतर मूलभूत सुविधांमधील त्रुटींचा अहवाल वरिष्ठांकडे मांडुन लवकरच पुर्तता करू. – शाम देशपांडे, उपाध्यक्ष, खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर