पुणे (कल्याणी फडके) –रस्त्यात मृत्यू पावणाऱ्यांचे स्मरण ठेवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार रस्ते अपघातातील मृतांचा स्मरणदिन म्हणून पाळण्यात येतो. रस्ते अपघातात कमीत कमी मृत्यू व्हावेत आणि त्यासाठी जनजागृती व्हावी, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. एका बाजूला जागतिक स्तरावरील हा दिन पाळला जात असताना पुण्यात गेल्या वर्षभरात तब्बल 199 जणांनी रस्ते अपघातात आपले प्राण गमावले आहेत.
सन 2011 ते 2020 हे दशक रस्ते अपघात मृत्यू कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचे दशक जागतिक पातळीवर पाळण्यात आले होते. या प्रश्नांचे गांभीर्य विचारात घेत 2021 ते 2030 या दशकात शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत रस्ता सुरक्षा उपाययोजनांची उद्दिष्टे ठेवली आहेत.
शहरातील वाढत्या वाहनसंख्येबरोबर अपुरे रस्ते आणि विविध ठिकाणी सुरू असणारी खोदकामे यामुळे मागील काही महिन्यांत किरकोळ अपघातांबरोबरच प्राणांतिक अपघातामध्ये देखील भर पडली आहे. जानेवारी ते डिसेंबर-2020 या कालावधीत 482 अपघातांची नोंद झाली होती. मात्र यंदा 31 ऑक्टोबरपर्यंत 581 अपघातांची नोंद झाल्याने अपघातांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
केव्हापासून पाळला जातो स्मरणदिन
रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्या नागरिकांची आठवण आणि त्यांच्या नातेवाईकांप्रती संवेदना म्हणून हा स्मरणदिन म्हणून पाळला जातो. इंग्लंडमध्ये 1993 सालापासून स्मरणदिन पाळण्याची सुरुवात झाली. त्यानंतर 2005 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका ठरावाद्वारे जगभरात हा दिवस दरवर्षी पाळण्याचे घोषित केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
स्मरणदिनाचे निमित्त साधून सुमारे
40 हून अधिक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयासह शासकीय संस्था, ड्रायव्हिंग स्कूल आदींच्या वतीने देखील विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
– संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
पुणे शहरातील अपघात
वर्ष प्राणांतिक गंभीर जखमी किरकोळ जखमी अन्य एकूण
अपघात मृत्यू अपघात जखमी अपघात जखमी
2019 199 206 388 463 142 163 62 791
2020 135 143 245 297 75 91 27 482
1 जाने. ते
31 ऑक्टो187 199 301 351 61 86 32 581