हिंजवडी – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मुळशी तालुक्यातील तहसील कार्यालयात सध्या कुणबी नोंदी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाकडून आतापर्यंत ८० टक्के गावांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये कुणबीच्या अठरा हजार नोंदी सापडल्या आहेत. महसूल प्रशासनाने राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर गावनिहाय या नोंदी प्रसिद्ध केल्या आहेत.
यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाकरिता लागणारे कुणबी दाखले मिळविण्यासाठी तहसील कचेरीत अर्ज करण्याचे आवाहन तहसीलदार रणजित भोसले यांनी केले आहे. हा कुणबी जातीचा दाखला मिळविण्यासाठी अर्जदारांनी आपल्या कुटुंबातील जन्म, मृत्यू नोंदीमध्ये कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी नोंद असलेला पुरावा तसेच वंशावळीचे प्रतिज्ञापत्र, वंशावळ सिद्ध करणारे सर्व पुरावे, महसूल दप्तरी असलेले जुने सातबारा उतारे, फेरफार तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडून दिल्यास तहसील कार्यालयाकडून कुणबी दाखला देण्यात येईल, अशी माहिती मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली.
८० टक्के काम झाले
या नोंदीच्या रजिस्टरमधील पानांची प्रत www. maharashtra.gov.in व https://pune.gov.in/kunbi- records-found- in-revenue- records/ या संकेतस्थळावर गावनिहाय अपलोड करून प्रसिद्ध केल्या आहेत. जन्म- मृत्यू रजिस्टर यामधील कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा नोंदी तपासण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार शाळांमधील प्रवेश रजिस्टर तसेच महसूलमधील गाव नमुना नंबर १४ मध्ये सन १९०० ते सन १९६७ पर्यंत असलेल्या नोंदींची तपासणी केली. हे काम ८० टक्के झाले आहे. त्यानुसार मुळशीत आतापर्यंत अठरा हजार नोंदी सापडल्या आहेत.