न्यूयॉर्क – वर्षभरात अमेरिकेत शाळांमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे असताना पुन्हा एकदा टेक्सास मधील एका शाळेत एका तरुणाने अंधाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात 21 जणांचा नाहक बळी गेला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 7 ते 10 वयोगटातील 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
#UPDATE | Texas school shooting death toll rises to 18 children, 3 adults, as per Texas state senator: AFP
— ANI (@ANI) May 25, 2022
18 वर्षीय हल्लेखोर तरुणाने मशीनगनच्या सह्यायाने शाळेत हा गोळीबार केला आहे. येथील रॉब प्राथमिक शाळेत हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये 18 विद्यार्थी व 3 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या गोळीबारात मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कथित हल्लेखोराने शाळेत गोळीबार करण्यापूर्वी त्याच्या आजीवर गोळ्या झाडून ठार केलं. त्यानंतर त्याने शाळेत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जो बायडेन यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली असून नव्याने बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी भाष्य केलं आहे. तसंच आपण केव्हा या गन लॉबीविरोधात उभं राहणार आहोत? अशी विचारणा केली आहे.