ह्युस्टन – अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील एका चर्चमध्ये एका महिलेने केलेल्या गोळीबारात एक पुरुष आणि ५ वर्षांचा लहान मुलगा जखमी झाला. जो ओस्टिन लेकवूड चर्चमध्ये रविवारी दुपारी स्पॅनिश सेवेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा हिंसाचार घडला. यावेळी चर्चमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर महिला ठार झाली.
लांब कोट परिधान केलेली ही अंदाजे ३५ वर्षांची महिला लांब रायफल घेऊन चर्चमध्ये आली होती. तिच्याबरोबर असलेला ५ वर्षे वयाचा मुलगा गोळीबारात जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले. हल्लेखोर महिलेशी या मुलाचे काय नाते होते, हे समजू शकलेले नाही. याशिवाय आणखी एका पुरुषाच्या पायाला गोळी लागली आहे.
या महिलेने आपल्या बरोबर बॉम्ब असल्याची धमकीही दिली होती. पण तिच्याबरोबर कोणतीही स्फोटके आढळली नाहीत. तिने आपल्याबरोबर आणलेला द्रव फरशीवर फवारला होता.
पण त्यात घातक काही नव्हते. या महिलेची ओळख पटू शकलेली नाही. गोळीबाराच्या एकूण २० ते ३० फैरींचे आवाज ऐकू आल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या गोळीबाराच्या घटनेचा तपास केला जात आहे. तसेच प्रत्युत्तरादाखल गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना तपास सुरू असेपर्यंत सुटीवर पाठवण्यात आले आहे. ह्युस्टनमधील लेकवूड चर्च अंदाजे १६ हजार लोकांची क्षमता असलेले मोठे चर्च आहे.