पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर्स आणि रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने 18 छोटे-मोठे दवाखाने बंद करून तेथील वैद्यकीय कर्मचारी वर्ग या सेंटर्स आणि रुग्णालयांमध्ये “शिफ्ट’ केले आहेत.
मनुष्यबळाच्या व्यवस्थापनासाठी हे दवाखाने तात्पुरते बंद करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत भरती प्रक्रिया राबवून वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध झाल्यावर दवाखाने पुन्हा सुरू करण्यात येतील, असे आरोग्य विभागाने सांगितले.
महापालिकेतर्फे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करणे, कोविड रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढवण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, वैद्यकीय मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले. या 18 दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी जवळचे महापालिकेचे रुग्णालय आणि दवाखान्यातील बाह्य रुग्ण विभाग संलग्न करून देण्यात आला आहे.
याशिवाय महापालिकेतर्फे 50 एमबीबीएस, 50 बीएएमएस, 100 परिचारिका आणि शंभर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी आणि गुरुवारी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर हे दवाखाने पुन्हा सुरू करण्यात येतील, असेही डॉ. साबणे यांनी नमूद केले.