लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी करोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी लागू केलेले निर्बंध अंशतः शिथिल करण्याची घोषणा केली आहे. देशात कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू करण्यात आल्यामुळे आता निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जाणार नाही, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे.
सोमवारपासून सहा जणांच्या गटात लोक एकमेकांना भेटू शकणार आहेत किंवा दोन कुटुंबातील लोकदेखील एकमेकांना भेटू शकणार आहेत. टेनिस, बास्केटबॉल, जलतरण यासह विविध खेळ खेळायच्या ठिकाणी लोकांना परवानगी देण्यात येणार असून इतर क्रीडाप्रकार देखील पुन्हा सुरू केले जातील, असे ते म्हणाले.
नागरिकांना आता घरातच राहण्याची आवश्यकता नसेल. पण अन्य अनेक निर्बंध यापुढेही सुरूच असतील. जर शक्य असेल, तर लोकांनी अजूनही “वर्क फ्रॉम होम’ सुरूच ठेवावे आणि अनावश्यक प्रवास करणे टाळावे, असे जॉन्सन म्हणाले.