सुरत – अल्पवयीन मुलांमधील स्मार्टफोनबाबतचे आकर्षण चिंताजनक ठरत आहे. स्मार्टफोनमधील गेम्सच्या आहारी गेलेली मुलं हिंसक बनत असल्याची अनेक प्रकरणे देशभरातून समोर आली आहेत. अशीच एक घटना गुजरातेतील सुरत येथे घडली आहे. वारंवार गेम खेळण्यास मनाई करत असल्याचा राग मनात धरत पोटच्या पोरानेच वडिलांचा गळा दाबून खून केला आहे. या मुलाचे वय केवळ १७ वर्षे असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, बालसुधारगृहात रवानगी केली.
मयत व्यक्ती सुरत शहरातील इच्छापोर पोलीस ठाणे हद्दीतील कवास गावाची रहिवाशी होती. येथे ते पत्नी व मुलासह वास्तव्यास होते. त्यांच्या १७ वर्षीय मुलगा स्मार्टफोन गेमिंगच्या आहारी गेला होता. सतत गेम खेळणाऱ्या मुलाने वडील रागावत असल्याचा राग डोक्यात धरून ते झोपेत असताना गळा दाबून खून केला.
मयत व्यक्तीचा मुलगा व पत्नीने मंगळवारी त्यांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात आणलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता तो मृत्युमुखी पडले असल्याचे आढळले. यावेळी मयत व्यक्तीच्या मुलगा व पत्नीने ते एका आठवड्यापूर्वी बाथरूममध्ये घसरून पडले होते. त्यांना इजा झाली होती. ते मंगळवारी झोपले ते परत उठलेच नाहीत असा बनाव रचला.
दिलेली माहिती डॉक्टारांनी संशास्पद वाटल्याने, त्यांनी या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. शवविच्छेदन अहवाला हे स्पष्ट झाले की, या व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आलेला आहे. त्यावर डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी आपल्या पद्धतीने मुलाची व पत्नीची विचारपूस केली असता, त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. मी कायम मोबाईलवर गेम खेळत असल्याने माझे वडील मला नेहमी रागावायचे, त्यामळे मंगळवारी जेव्हा ते झोपले होते तेव्हा मी त्यांचा गळा दाबला, असं १७ वर्षीय मुलाने पोलिसांसमोर कबूल केलं.
यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नी व मुलास ताब्यात घेतलं व पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. मुलाचा जबाब नोंदवल्यानंतर त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे.