वालचंदनगर, (वार्ताहर) – पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर १७ पथके मोठ्या प्रमाणात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री होण्याची शक्यता विचारात घेता उत्पादन शुल्क विभागाने नियमित १४ व ३ विशेष अशी एकूण १७ पथके तैनात केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली. परराज्यातून येणाऱ्या दारूवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पुणे अधीक्षक चरणसिंह रजपूत पुढे म्हणाले की, यंदाच्या वर्षी उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे शाखेला तब्बल २ हजार ७३५ कोटींचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ २२ टक्क्यांनी म्हणजेच ५०४ कोटींनी जास्त आहे. छुपी दारू वाहतूक, अवैध दारू विक्रीवर केलेल्या प्रभावी कारवाईसह महसूल वाढीसाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे यंदा महसुलात वाढ आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे शाखेने मागील वर्षभरात गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करून अनेकांना अटकदेखील केली. यंदा विभागाला २ हजार ७३५ कोटींचा महसूल मिळाला. तर, गतवर्षी हा महसूल २ हजार २३१ कोटी एवढा होता. एकूण २२.५९ टक्के एवढी ही वाढ आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मागील वर्षपिक्षा यंदा देशी मद्य, बिअर व वाईनच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशी मद्याच्या विक्रीमध्ये ७.३ टक्के, विदेशी मद्याच्या विक्रीत १०.७ टक्के, बीअर विक्रीत १०.६ टक्के तर वाईन विक्रीत ०.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.विभागाने वारंवार गुन्हे करणाऱ्या १० आरोपींवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून त्यांना स्थानबद्ध केले आहे.
यंदाच्या वर्षी २ हजार ७३५ कोटींचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ २२ टक्क्यांनी म्हणजेच ५०४ कोटींनी जास्त आहे. जिल्ह्यामध्ये अवैध मद्यवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी तात्पुरती तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
अवैध मद्याची वाहतूक करणारी तब्बल ४२२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यापुढेही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री; तसेच अमली पदार्थाविरोधात नियमित कारवाई सुरू राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील व ग्रामीण कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री; तसेच अमली पदार्थांबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे आवाहन अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले.
वर्षभरात १८ कोटींचा मुद्देमाल जप्त
१८ कोटी ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त विविध प्रकारे कारवाई करत १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८ कोटी ४७ लाख ३४ हजार ५११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूची अवैधपणे वाहतूक करून विक्री करण्यात येणारे मद्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर ३ हजार ३७० गुन्हे दाखल करून ३ हजार ५१३ आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.