पॅरिस/ नवी दिल्ली: “कोविड-19’च्या साथीमुळे जगभरातील बहुतेक सर्व शिक्षणसंस्था सध्या बंद आहेत. त्यामुळे सुमारे 154 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होत आहेत. त्यातही शिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाची अत्यंत दुरवस्था होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रामधील लैंगिक तफावत अधिकच वाढण्याची शक्यता असल्याचे “युनेस्को’ने म्हटले आहे.
“कोविड-19’च्या साथीमुळे शाळा, कॉलेज बंद ठेवल्यामुळे मुलींनी शाळा, कॉलेज सोडण्याचे प्रमाण वाढेल. त्यांची लग्नेही लवकर लावून दिली जातील आणि मुलींना अकाली मातृत्वालाही सामोरे जावे लागू शकते, असे युनेस्कोच्या सहाय्यक शिक्षण महासंचालक स्टेफेनिया जियानिनी यांनी सांगितले.
जगभरात शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 89 टक्के विद्यार्थी सध्याच्या करोनाच्या साथीमुळे शिक्षणासून दूर आहेत. ही संख्या एकूण 154 कोटी असून त्यात 74 कोटी मुलींचा समावेश आहे. त्यातील 11 कोटी मुली या अविकसित देशांमधील आहेत. या देशांमध्ये शिक्षण मिळणेच मुळात अवघड अहे. आश्रय शिबीरांमध्ये वास्तव्य करायला लागलेल्या मुलींच्या शिक्षणचे जे नुकसान होत आहे, त्यामुळे मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रात 20 वर्षे झालेली प्रगती संपुष्टात येऊ शकते, असेही जियानिनी यांनी सांगितले.
मुलींच्या शिक्षणाकडे बघण्याच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे या आपत्तीनंतरही मुलींना शाळा, कॉलेजचे शिक्षण देण्यास पालक उत्सुक नसतील. बेमुदत शाळा बंद ठेवल्यामुळे उद्भवणारी ही समस्या टाळण्यासाठी सर्व देशांच्या सरकारांनी धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवाहनही “युनेस्को’च्यावतीने त्यांनी केले.
मुलींच्या शिक्षणाला अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी दूरस्थ शिक्षणासारख्या पर्यायाचा विचार व्हावा, असेही त्यांनी सुचवले आहे. शिक्षणाची दुरवस्था झाल्यास भविष्यात रोजगार, उदरनिर्वाह, जीवनमानाचा घसरणारा आलेख आदी समस्याही उद्भवू शकतात. त्याचबरोबर आर्थिक विपन्नावस्थेकडेही वाटचाल संभवते, या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार आवश्यक असल्याचे जिओनिनी म्हणाल्या.