15 वर्षांच्या नियोजनशून्य कारभाराला लागणार ब्रेक!

माजी आमदार विलास लांडे : महाआघाडीच्या डॉ. अमोल कोल्हेंची प्रचारात आघाडी

भोसरी – शिरूर लोकसभा मतदारसंघात आता बदलाचे वारे दिसू लागले आहेत. आतापर्यंतच्या प्रचारात डॉ. अमोल कोल्हे यांना लहान-थोर, माता-भगिनी आणि विशेषकरून युवा वर्गाकडून मिळालेला प्रतिसाद हा स्वयंस्फूर्तीतून आहे. महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदार संघात दिसत आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील हे बदलाचे वारे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गेल्या 15 वर्षांच्या नियोजनशून्य कारभाराला ब्रेक लावणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे, असे मत माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केले.

शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी (दि. 9) उमेदवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंतच्या प्रचारात डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभेत समाविष्ट असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी, शिरुर व हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचार रॅली, सभा व भेटीगाठीतून मतदारांशी थेट संपर्क साधला आहे. असे सांगून माजी आमदार विलास लांडे म्हणाले, उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना सर्वदूर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नारायणगाव, वारुळवाडी ग्रामस्थांप्रमाणे अनेक ठिकाणी डॉ. अमोल कोल्हे यांना एकमुखी जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. पाठिंबा देतानाच त्यांनी तब्बल दहा लाख रुपये निवडणुकीच्या खर्चासाठी लोकवर्गणीतून दिले. शंभर, पाचशे रुपयांपासून लोकवर्गणी देत मतदार स्वत: निवडणुकीत सहभागी होत आहेत. ही निवडणूक प्रत्येकाला आपलीच वाटू लागल्याने ते स्वयंस्फूर्तीने यात सहभागी होताना दिसत आहेत. यावरुनच शिरुर लोकसभेत बदलाचे वारे वाहू लागल्याची खात्री येते.

व्हिजन ठेवून मतदारांशी संवाद
शेतकरी, युवा वर्ग, महिला, आदिवासी यांच्या दृष्टीकोनातून आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरुर लोकसभा मतदार संघात उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा विचार करुन डॉ. अमोल कोल्हे मतदार संघाच्या विकासाबद्दल स्वत:चे व्हिजन मांडत आहेत. आदिवासींच्या विकासासाठी वनौषधी संबंधी संशोधन केंद्र, प्रक्रिया उद्योग, शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग, शेतीमालाला हमीभाव, महिला बचत गटामार्फत व्यवसायांचा विकास व त्याद्वारे महिलांचे सबलीकरण, युवा वर्गाच्या हाताला काम मिळावे म्हणून उद्योग विकास, क्रीडा प्रशिक्षण केंद्र, चित्रपट चित्रीकरणाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास आदींबाबत डॉ. अमोल कोल्हे थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. आणि यासाठीच आपल्याला मतदान करण्याचे आवाहन ते करीत आहेत. असे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.