आजपर्यंत 76 जण करोनामुक्त : उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
पिंपरी – करोनाचा “हॉटस्पॉट’ ठरलेल्या निगडी-रुपीनगरसाठी एका दिलासादायक बातमी समोर आली आहे. रुपीनगरमधील तीन वर्षांच्या दोन मुलींसह सहा पुरुषांनी आणि भोसरी, मोशीतील सात जणांनी अशा 15 रुग्णांनी आज (शुक्रवारी) एकाचदिवशी कोरोनावर मात केली आहे. महापालिका रुग्णालयात उपचार घेऊन आत्तापर्यंत 76 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शुक्रवार सायंकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या करोनाबाधितांपेक्षा या आजारावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे, ही समाधानाची बाब मानली जात आहे.
निगडी रुपीनगर परिसरातील एका 26 वर्षांच्या तरुणाला 23 एप्रिल रोजी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांना करोनाची लागण झाली होती. बघता-बघता रुग्ण सख्येने 30 चा आकडा गाठला होता. लहान मुलांना देखील करोनाची लागण झाली होती. तसेच तळवडे, ताम्हाणेवस्तीमधील देखील काही जणांना करोनाची लागण झाली. रुपीनगर भाग करोनाचा हॉटस्पॉट झाला. त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष रुपीनगरकडे लागले होते. रुपीनगर परिसरातील नागरिक देखील चिंतेत होते.
महापालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी उपचाराला 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने 15 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यानंतरच्या 24 तासाचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे करोनामुक्त होत ठणठणीत बरे झालेल्या या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये रुपीनगरमधील तीन वर्षाच्या दोन मुलींनी आणि सहा पुरुषांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुपीनगरमधील सक्रिय रुग्ण संख्या कमी झाली आहे. तर, भोसरी, मोशीतील सात जणांनी अशा 15 जणांनी आज दिवसभरात करोनावर मात केली आहे.
सहा वर्षांच्या चिमुकल्यासह पाच जणांना करोनाची लागण
शहरातील करोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून आज पुन्हा नव्याने पाच जणांना करोनाची बाधा झाली आहे. पाच रुग्णांपैकी एक रुग्ण शहराबाहेरील आहे. शहरातील बाधितांचा आकडा 155 वर पोहोचला आहे. तर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 68 रुग्ण उपचार घेत आहेत.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने शहरातील 175 संशयितांचे नमुने गुरुवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज (शुक्रवारी) प्राप्त झाले असून त्यामध्ये पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये पुणे येथील एका सहा वर्षांच्या बाळासह चिखली ताम्हाणे वस्ती येथील 29 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय महिलेचाही आज बाधा झालेल्यांमध्ये समावेश आहे. तसेच मोशी येथील 75 वर्षीय महिला व नवी सांगवी येथील 16 वर्षीय मुलीचा समावेश आहे.