जालना – जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने 15 लाखांचे भेसळयुक्त बायोडिझेल आणि 15 लाखांचा टँकर असा सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. हे टॅंकर पनवेलकडून रायपूर छत्तीसगडकडे जात होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरवठा विभागाचे जिल्हा पुरवठा निरीक्षक प्रकाश शिवाजी जाधव यांना खबऱ्याकडून भेसळयुक्त बायोडिझेल घेऊन टँकर येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जालना- देऊळगाव राजा रोडवर पानशेंद्रा शिवारामध्ये टॅंकर पकडण्यासाठी सापळा रचला. रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास जालन्याकडून टँकर येत असल्याचे दिसले. या टँकरला थांबवून टँकरची कागदपत्रे आणि टँकरमधील मालाविषयी विचारणा केली असता, टँकर चालकाने सांगितले की, मालकाने न्यू आजीवली व्हीलेज (ता. पनवेल जि. रायगड) येथून हे टँकर भरून दिले आहे आणि ते रायपूर छत्तीसगडकडे नेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे हा टँकर नेत आहे.
टँकरमधील बायोडिझेलचा नमुना तपासणीसाठी काढून घेत भेसळयुक्त बायोडिझेलने भरलेले हे टँकर तालुका पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आले आहे. टँकर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 15 लाख रुपयांचा टँकर आणि 15 लाख रुपयांचे भेसळयुक्त बायोडिझेल असा सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.