पाटना – वहिनीसोबत अवैध संबंध ठेवण्यासाठी पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधील मीरगंज पोलीस ठाणे हद्दीतील काशी समइल गावात घडला आहे. विजय गोंड असे आरोपी पतीचे नाव असून, संजू देवी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलवरिया पोलीस ठाणे हद्दीत राहणारी संजू देवीचे लग्न मीरगंज येथील विजय गोंडसोबत झाले होते. मृत महिलेला दोन मुलेही आहेत.
मात्र पतीचे त्याच्या वहिनीसोबत अवैध संबंध होते. संजू अनेकदा याचा विरोध करीत होती. मात्र पती वहिनीविरोधात एकही शब्द ऐकून घेत नव्हता. तो वारंवार पत्नीला मारहाण करीत होता.
यामुळे संजू रागाच्या भरात माहेरी निघून गेली होती. 25 फेब्रुवारी रोजी संजू आपल्या माहेराहून सासरी आली. त्याच रात्री पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या संजू देवीवर पतीने तलवारीने वार केले. आरोपी केवळ हत्या करून थांबला नाही तर त्याने धारदार हत्याराने पत्नीच्या मृतदेहाचा तुकडे तुकडे केले. यानंतर तो वहिनीसोबत मिळून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करू लागला. घटनेची माहिती मिळ्यानंतर पोलीस घरी पोहोचले असता अंगणात रक्त सांडले होते. आरोपी आणि त्याच्या वहिनीसह संपूर्ण कुटुंब घर सोडून फरार झाले होते. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.