मुंबई – “टीआरपी’ गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांनी “ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ अर्थात “बार्क’च्या माजी कार्य अधिकाऱ्याला गुरुवारी अटक केली. रोमी रामगार्हिया असे अटक करण्यात आलेल्या माजी अधिकाऱ्याचे नाव आहे.
“टीआरपी’ गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शखेच्या पथकाने आज दुपारी त्यांना अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी करण्यात आलेली ही 14 वी अटक आहे.
तपासादरम्यान रामगार्हिया यांचा या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानंतर रामगार्हिया यांना आज अटक केली गेली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रामगार्हिया यांना स्थानिक न्यायालयासमोर उपस्थित केले जाणार आहे.
रविवारी पोलिसांनी रिपब्लिक मिडीया नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांनाही या प्रकरणी अटक केली आहे. मात्र खानचंदानी यांना बुधवारी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला.