करोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने प्रशासन चिंतित
दिवसभरात करोनाचे 15 बळी
पुणे – शहरात बुधवारी तब्बल 1416 नवे करोनाबाधित आढळले. स्वॅब टेस्ट आणि रॅपिड ऍन्टिजेन टेस्टची संख्या वाढवल्याने हा आकडा समोर आला आहे. तर दिवसभरात आणखी 746 जण करोनामुक्त झाले असून, 15 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. या नव्या उच्चांकाने शहरातील करोनाग्रस्तांचा एकूण आकडा 30,523 वर गेला आहे.
आरोग्य विभागाने बुधवारी दिवसभरात आणखी 6 हजार 343 जणांची तपासणी केली. यात 4,015 संशयितांची स्वॅब टेस्ट आणि 2,328 जणांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आली. दरम्यान, सध्या शहरात करोना ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 10 हजार 64 इतकी आहे. त्यांच्यावर डॉ. नायडूसह अन्य रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
यातील 502 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 76 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. तर, 426 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, 18 हजार 26 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. बुधवारच्या आकडेवारीनंतर शहरातील करोनामुक्तांची एकूण संख्या 19 हजार 570 झाली आहे. दरम्यान, करोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.