पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कात्रज- कोंढवा रस्ता (खडीमशिन चौक) ५० मीटर रूंद केला जाणार आहे. याकामासाठी आवश्यक भूसंपादनासाठी राज्यशासनाकडून १३९ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या एक दिवस आधी या निधीचे अध्यादेश शासनाकडून काढण्यात आले.
कात्रज-कोंढवा रस्ता रूंदीकरण भूसंपदानासाठी एकूण २७९ कोटी ६७ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.शासन आणि महापालिकेने प्रत्येकी ५० टक्के खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने १३९ कोटी ८३ लाखांच्या निधीस राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.
त्याच वेळी महापालिका प्रशासनाकडूनही २०२४-२५ या वर्षाच्या अंदाजपत्रकात ११९ कोटींची तरतूद करण्यात आली. यात भूसंपादनासाठी ७४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आहे. त्यामुळे, महापालिकेस आणखी ६० कोटींची तरतूद याकामासाठी करावी लागणार आहे.
अखेर अद्यादेश निघाला…
महापालिकेकडून सुमारे साडेतीन कि.मी.चा रस्ता ८४ मीटर रूंद केला जाणार होता. मात्र, भूसंपादनासाठी ७१५ कोटींचा खर्च येत असल्याने पालिकेने हा रस्ता ५० मीटर करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, भूसंपादनाचा खर्च थेट २८० कोटींंवर आला, मे २०२३ पासून पालिकेकडून या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. तीन आठवड्यांपूर्वी पालिकेस हा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात आदेशच काढलेले नव्हते. अखेर, १५ मार्चला आध्यादेश निघाला आहे.
पूलाचे विस्तारीकरण रखडणार…
कात्रज चौकात उभारण्यात येणारा उड्डाणपूल खडी मशिनच्या दिशेने ८०० मीटर वाढविण्याच्या सूचना होत्या. पालिकेने त्याचा प्रस्तावही सादर केला. मात्र, लोकसभेचे जागा वाटप तसेच राजकीय घडामोडींमुळे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासकीय बैठका होत नसल्याने या पूलाचे विस्तारीकरणही रखडले. आता, लोकसभा निवडणुकीच्या आचरसंहितेनंतरच हा निधी मिळणार आहे.
शासनाकडून निधी मिळाल्याने तातडीने भूसंपादन प्रक्रीया केली जाईल. निधी लक्षात घेऊन महत्वाच्या जागांचे आधी भूसंपादन केले जाईल. त्यामुळे कोंडी फोडण्यास मदत होईल. – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका