मुंबई, दि. 25 – मुंबई महानगरातील वाढती गरज लक्षात घेऊन या महानगरात 14 नवीन ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसवले जाणार आहेत. राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही माहिती दिली. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यातील प्रत्येक प्लांटमधून दर दिवशी 2 टन ऑक्सिजनची निर्मिती होईल.
हा ऑक्सिजन दोनशे खाटांवरील रुग्णांना पुरेल. जे 14 प्रकल्प उभारले जात आहेत, त्यातील तीन प्रकल्प ठाण्यात होतील. कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईत प्रत्येकी दोन प्रकल्प उभारले जातील. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भायंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्रकल्प उभारला जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रकल्प उभारणीचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून, येत्या काही दिवसांत ते सुरू होतील असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचेही पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यातील अशा प्रकारचे पाच ते सहा प्रकल्प सुरू होत आहेत, असे ते म्हणाले. या प्रकल्पांमध्ये हवेतील ऑक्सिजन गोळा केला जाणार आहे.