प.बंगाल : अबब! तस्करीत सापडल्या तब्बल 7 कोटींच्या पाली

पश्चिम बंगाल : ‘पाल’..! नुसता शब्द उच्चारला तरी ईsss. अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया असते. साधारणपणे भिंतींवर, झाडांवर, कुंपणावर आढळणाऱ्या या पालीना पाहिलं की लगेच त्यांना पिटाळून लावले जाते. पण याच पालींच्या एका दुर्लभ जातींची किंमत ऐकली तर डोळे पांढरे होतील. होय, तब्बल सात कोटी अशी आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत असणाऱ्या ‘टोके गेको’ या प्रजातीच्या 14 पालींची तस्करी होताना प.बंगालातील 24 परगणा जिल्ह्यात बीएसएफने पकडले आणि वनविभागाकडे सोपविले. या अत्यंत ‘किंमती’ पालींबाबत जाणून घेणं तितकेच रोचक आहे.

‘टोको गेको’ ही पालींची जात पूर्वोत्तर भारत, भूतान, नेपाळ आणि बांगलादेश तसेच फिलिपिन्स, मलेशिया, तैवान आणि इंडोनेशियासह पश्चिम न्यू गिनी या देशांमध्ये आढळते. ही पाल मानवी वसाहतीत सहसा आढळत नाही. जंगलात झाडे आणि खडकांवर आढळणारी ‘टोको गेको’ शिकारीसाठी आणि स्वतःच्या बचावासाठी रंग बदलते.

ड्रॅगनचे छोटेखानी वंशज असणाऱ्या या पालीची 30 सेमी (12 इंच) इतकी लांबी असते. काहीसे चपटे असलेल्या या पालीचे शरीर हिरवट राखाडी रंगाचे असते. यावर लाल रंगाचे ठिपके असतात. नर पाल आकाराने मोठा आणि अधिक चमकदार दिसतो. शरीर काटक असल्यामुळे उभ्या पृष्ठभागावर पायाच्या घट्ट पकडीने ही पाल दीर्घ काळ उभी राहू शकते.

काही ठिकाणी या पाली पाळल्याही जातात. मात्र, आक्रमक असल्यामुळे कधी कधी यांच्या चाव्याचा प्रसाद मालकांना खावा लागतो. त्याच्या चाव्याने रक्तस्राव ही होऊ शकते. ‘टोको गेको’ ची मादी एकावेळेस एक किंवा दोन अंडे देते. अंड्यातून पिले बाहेर येईपर्यंत मादी पाल त्यांचे संरक्षण करते. यांचे मुख्य खाद्य म्हणजे किडे, फळ, गवत आदी असते.

पूर्व आशियाई देशांमध्ये ‘टोको गेको’चा उल्लेख प्राचीन संस्कृती आणि साहित्यात अलौकिक शक्तींचा प्रतीक म्हणून केलेला आढळतो. आग्नेय आशियात ‘टोको गेको’ ला भाग्य आणि सुबत्तेचं प्रतीक समजलं जातं. ड्रॅगन पासूनच ‘टोको गेको’ ची उत्पत्ती झाल्याचं इथे मानलं जातं.

दुर्मिळ मानल्या गेलेली ही पाल पारंपरिक चिनी औषधासाठी एक महत्त्वपूर्ण घटक असल्यामुळे औषधी व्यापारासाठी हिची मोठ्या प्रमाणावर तस्करी व शिकार केली जाते. चीन, हाँगकाँग, तैवान, व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर या देशांमध्ये ‘टोकोगिको’ ला प्रचंड मागणी आहे. फिलिपाईन्समध्ये या पालींची अंदाधुंद शिकार केल्यामुळे तिची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या एका पालीची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे.

फिलिपाईन्समध्ये या परवान्याशिवाय ‘टोको गेको’गोळा करणे, त्यांची वाहतूक करणे आणि व्यापार करणे यासाठी रिपब्लिक ऍक्ट 9147 नुसार बारा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि तब्बल 1 कोटी फिलिपिन्स पेसो असा दंड आहे. त्यामुळेच तस्करांच्या ‘हिटलिस्टवर असणाऱ्या ‘टोको गेको’ चे संरक्षण आणि संवर्धन करणे हे वन्यविभागासमोर मोठे आव्हान आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.