नवी दिल्ली -दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील 13 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. त्याशिवाय, दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील 6 अधिकाऱ्यांनाही त्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील करोनाबाधितांच्या संख्येने याआधीच 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अशातच करोनाने आता थेट नायब राज्यपालांच्या कार्यालयात शिरकाव केला आहे. करोनाची बाधा झालेल्यांमध्ये नायब राज्यपाल सचिवालयात कार्यरत असणारे कनिष्ठ सहाय्यक, शिपाई आणि वाहन चालकांचा समावेश आहे.
याआधीच एक कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने त्या सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या चाचण्या करून घेतल्या. करोनाबाधितांच्या संख्येत दिल्ली देशात महाराष्ट्र आणि तामीळनाडूपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.