नवी दिल्ली: भाजपने मंगळवारी दिल्ली आणि छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष बदलले. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर भाजपने नियमित राजकीय हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
खासदार मनोज तिवारी यांच्या जागी भाजपने आदेशकुमार गुप्ता यांना दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष बनवले. गुप्ता हे उत्तर दिल्ली महापालिकेचे माजी महापौर आहेत.
भोजपुरी स्टार असणाऱ्या तिवारी यांचा कार्यकाळ याआधीच समाप्त झाला होता. त्याशिवाय, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या हातून भाजपला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तिवारी यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, प्रदेशाध्यक्षपदासाठी पर्याय मिळेपर्यंत पक्षाने त्यांना काम सुरू ठेवण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, भाजपने माजी केंद्रीय मंत्री विष्णूदेव साई यांच्यावर छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. ते विक्रम उसेंडी यांची जागा घेतील.
\देशात करोना संकट उद्भवल्यामुळे मागील काही काळापासून राजकीय हालचाली ठप्प आहेत. इतर पक्षांप्रमाणे भाजपही त्याला अपवाद ठरला नव्हता. आता 1 जूनपासून देशव्यापी लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ भाजपने पहिल्यांदाच संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल केले. त्यातून भाजप आता राजकीय हालचालींसाठी सज्ज होत असल्याचे मानले जात आहे.