लखनौ – स्थलांतरित मजुरांची घरवापसी उत्तरप्रदेशसाठी टेन्शन वाढवणारी ठरली आहे. विविध राज्यांतून नुकतेच उत्तरप्रदेशात दाखल झालेल्या तब्बल 1 हजार 230 स्थलांतरित मजुरांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात घरवापसीची परवानगी मिळाल्यानंतर उत्तरप्रदेशात परतणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. त्यातून मागील काही दिवसांत त्या राज्यात तब्बल 20 लाख स्थलांतरित मजूर दाखल झाले. त्यातील 5 लाख 42 हजार मजुरांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1 हजार 230 मजुरांची करोनाविषयक चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे पूर्व उत्तरप्रदेशात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातून बाराबंकी हा उत्तरप्रदेशातील करोना फैलावाचा नवा हॉटस्पॉट ठरला आहे.
बाराबंकीमध्ये एकाच दिवशी नवे 95 करोनाबाधित आढळले. त्यातील निम्म्याहून अधिक परतलेले स्थलांतरित मजूर आहेत. दरम्यान, उत्तरप्रदेशातील करोनाबाधितांची संख्या 5 हजार 356 इतकी झाली आहे. त्या राज्यात करोनाने आतापर्यंत 127 बाधितांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेशातील 3 हजारहून अधिक बाधित करोनामुक्त झाले आहेत.