पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ग्रामीण भागातील बार, परमिट रुम, रेस्टॉरंटमधून गैरप्रकार, तसेच हुक्का पार्लरमधून “हर्बल’ नावाखाली निकोटीनयुक्त हुक्का ग्राहकांना दिले जात आहेत. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत.
त्यानुसार ग्रामीण भागातील सर्व बार, परमिट रुम हे रात्री साडेबारा वाजता पूर्णपणे बंद करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिले आहेत. तसेच 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला मद्य विकले जाणार नसल्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
पुणे शहरात पुणे पोलीस आयुक्त यांनी नुकतेच पब, हाॅटेल रात्री दीड वाजताच बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील पब रात्री बंद होत असल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा शहरालगतच्या गावांमध्ये असलेल्या हुक्कापार्लर आणि बारकडे वळवला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक हुक्का पार्लर, बार, परमिट रुम हे पहाटेपर्यंत सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.
यासर्व पार्श्वभूमीवर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्याच्या दृष्टीने आणि शांतता राखण्यासाठी ग्रामीण भागातील हॊटेल्स, परमिट रुम, हुक्का पार्लर यांच्या नियमानासाठी दि.7 मार्च 2024 या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 नुसार आदेश जारी करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली होती.
जिल्हा प्रशासनाने दिलेले आदेश
– ग्रामीण भागातील सर्व बार परमिट रुम हे बरोबर रात्री साडेबारा वाजता पूर्णपणे बंद करावेत.
– रात्री 12 नंतर खाद्यपदार्थ आणि मद्याची आॅर्डर घेऊ नये.
– हाॅटेल्समध्ये येण्या-जाण्याचा मार्ग, ग्राहक बसण्याची जागा, बार काउंटर आदी ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत
– ग्राहक बसण्याच्या ठिकाणी नृत्य करण्याची परवानगी नाही