मलठण,(वार्ताहर)- दौंड तालुक्यातील जोतिबानगर (काळेवाडी) येथील अर्चना नामदेव भोसले हिची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीपदी निवड झाली आहे.
सन २०२३ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातून ६५०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेत अर्चना भोसले हिने १२२ गुणांसह गुणवत्ता यादीमध्ये २२६ क्रमांक पटकावला आहे.
अर्चना भोसले हिचे जोतिबानगर काळेवाडी हे माहेरघर असून पै. नामदेव भोसले यांनी आपल्या लेकीला शेतीमध्ये काबाडकष्ट करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचे अर्चनाने सोनं केले आहे. दोन वर्षापूर्वी तिचा विवाह खोर (ता. दौंड) येथील चौधरी कुटुंबामध्ये झाला. विवाहानंतर विभागातील परीक्षा देऊन यश संपादन केले आहे. या निवडीमुळे परिसरातून अर्चनाचे कौतुक होत आहेत