पुणे – वनक्षेत्रातील वृक्षांचे संवर्धन व्हावे, तसेच वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यासाठी वनविभागातर्फे राज्य सरकारकडे टॅंकरची मागणी करण्यात आली होती. या मागणीला मंजुरी मिळाली असून, विभागाला 12 टॅंकर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापैकी दोन टॅंकर हे इंदापूर तालुक्यात कार्यरत आहेत.
वनविभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, कमी पावसामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे झाडांना जिवंत ठेवण्यासाठी, तसेच परिसरातील वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान होते. विशेषत: उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण अत्यल्प असते. अशावेळी जवळपासच्या गावांतून पाणी आणावे लागते.
अनेकदा हे पाणी खाजगी टॅंकरचालकांच्या मदतीने होत असत. मात्र, त्यासाठी जास्त खर्च होत असल्याने विभागाने गेल्या वर्षी राज्य शासनाकडे टॅंकरसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.