नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठी सनसनाटी निर्माण झाली. त्या ट्विटमधून मोदी सोशल मीडियापासून दूर जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे सूचित होत आहे. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, मोदी रविवारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
सोशल मीडियावर मोदी सातत्याने अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे मोठ्या संख्येने फॉलोअर्सही आहेत. त्यामुळे मोदींनी केलेले ट्विट सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारे ठरले आहे. मात्र, भारत सरकार एखादा नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेऊन येणार असल्याचा तर्क नेटकऱ्यांनी लावला आहे. पंतप्रधान अनेकदा असे धक्कादायक निर्णय घेत असतात.
पंतप्रधानांच्या या ट्विटवर भाजपाच्या आयटी सेल प्रमुख अमित मालवीय म्हणाले, जगात असे खूपच कमी राजकीय नेते असतील ज्यांनी मोदींप्रमाणे सोशल मीडियाचा इतक्या चांगल्या प्रकारे वापर केला असेल. पंतप्रधानांना नक्की काय म्हणायचंय याबाबत आत्ताच कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. यासाठी आपल्याला रविवारपर्यंत वाट पहावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सोशल मीडियात मोठ्या संख्येने फॉलोअर्स असणाऱ्या आघाडीच्या जागतिक नेत्यांमध्ये मोदींचाही समावेश आहे. ट्विटरवर 5 कोटी फॉलोअर्सचा आकडा ओलांडणारे ते पहिले भारतीय ठरले. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही साडेतीन ते 4 कोटींच्या घरात आहे. सोशल मीडियामुळे मोदी यांची लोकप्रियता वाढण्यात मोठा हातभार लागल्याचे मानले जाते.